जिओ मामि मुंबई फिल्म फेस्टिव्हल 2023 ची घोषणा करण्यात आली आहे. 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या 10 दिवसांच्या कालावधीत 250 हून अधिक सिनेमे या महोत्सवात दाखवले जाणार आहेत. या वैविध्यपूर्ण महोत्सवात 40 हून अधिक वर्ल्ड प्रीमिअर्स पार पडणार आहेत. तर 45 आशिया प्रीमिअर्स आणि 70 हून अधिक दक्षिण आशिया प्रीमिअर्स पार पडतील.
9 September 2023
विशेष म्हणजे यंदा दक्षिण आशिया विभागासाठी विक्रमी 1000 हून अधिक सिनेमांच्या प्रवेशिका आल्या आहेत. दक्षिण आशियातील समकालीन सिनेमे आणि सिनेमाच्या माध्यमातून उमटणाऱ्या नव्या जाणीवांवर भर दिला जाणार आहे. यंदाच्या या महोत्सवात सर्वाधिक महत्त्वाची असणार आहे दक्षिण आशिया स्पर्धा. दक्षिण आशिया आणि दक्षिण आशियातून जगभरात पोहोचलेल्या सिनेकर्त्यांसाठी, त्यांच्यातील प्रतिभेसाठी महत्त्वाचे केंद्र बनण्याचे या महोत्सवाचे नवे उद्दिष्ट या स्पर्धेतून दिसून येते. नव्या दमाचे, वेगळे समकालीन दक्षिण आशियाई सिनेमे प्रेक्षकांसमोर आणणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे. हिंदुस्थान, बांग्लादेश, भूतान आणि नेपाळ तसेच यूके आणि जर्मनीत वास्तव्यास असणाऱ्या या भागातील उदयोन्मुख फिल्ममेकर्स तसेच दुसऱ्यांदा सिनेमा बनवणाऱ्यांचे 14 सिनेमे यात आहेत. शिवाय, स्पर्धेबाहेरच्या विभागातही 46 दक्षिण आशियाई सिनेमांचा (22फिचर फिल्म+ 24 नॉन-फिचर) समावेश आहे. या सर्वच सिनेमांतून दक्षिण आशियातील वैविधता आणि संपन्न कलागुणांना वाव दिला जाणार आहे. म्यानमार, नेपाळ आणि बांगलादेशातील सिनेमांचा या विभागात समावेश आहेच. शिवाय, या देशांमधून ऑस्ट्रेलिया, जर्मनी, अमेरिका, यूके, पोलंड आणि स्पेनमध्ये स्थलांतरित झालेल्या सिनेकर्त्यांच्या दृष्टिकोनातून बनलेले सिनेमेही यात आहेत.
या महोत्सवातील वर्ल्ड सिनेमा किंवा जागतिक सिनेमा विभागात 35 हून अधिक देशांमधील 90 हून अधिक सिनेमांचा समावेश आहे. जगभरात यंदा पार पडलेल्या विविध चित्रपट महोत्सवांमधील काही बहूचर्चित सिनेमेही इथे पाहता येतील. पाल्मे डी’ऑर पुरस्कार विजेता जस्टिन ट्रिएट यांचा अॅनाटॉमी ऑफ अ फॉल, ऑस्करपर्यंत पोहोचलेला ब्रॅडले कुपर यांचा मॅस्ट्रो, सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऑडिअन्स अॅवॉर्ड पटकावलेला मॅडलेन गॅविन यांचा बीयाँड युटोपिया असे एकाहून एक सरस सिनेमे यंदा मामि महोत्सवात पाहता येतील. शिवाय पेड्रो कोस्टा यांचा द डॉटर्स ऑफ फायर, हिरोकाझु कोरे-एडा यांचा मॉन्स्टर, हाँग सँग-सू यांचा इन अवर डे, पेड्रो अल्मोडोवर यांचा स्ट्रेंज वे ऑफ लाईफ, केन लोच यांचा द ओल्ड ओक, अकी कौरीस्माकी यांचा फॉलन लीव्ह्स आणि अॅलिस रोहरवॉचर यांचा ल शिमेरा हे सिनेमेही यात आहेत.
Share Article: